* मासुंदा, खारकर आळी, चरई भागात लवकरच कार्यान्वित
* आमदार संजय केळकर यांचा पुढाकार..
ठाणे:जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी, माजिवडा, कोलशेत, बाळकूम आदी परिसरात गेल्या तीन वर्षात 6500 च्या वर घरांना महानगर गॅस जोडण्या आमदार संजय केळकर यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नागरिकांचा कल वाहिन्यांद्वारे इमारतींमध्ये घरगुती गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडे वाढू लागला आहे. मात्र वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे ही गॅस जोडणी मिळवताना नागरिकांच्या नाकी नऊ येत असतात. आमदार संजय केळकर यांनी नागरिकांची ही अडचण ओळखून ठाणे शहर मतदारसंघातील नागरिकांना महानगर गॅस जोडणी देण्याचा संकल्प तीन वर्षांपूर्वी केला. आणि पाहता पाहता त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आतापर्यंत ६५००हून जास्त कुटुंबांना गॅस जोडणी मिळवून दिली आहे. यात जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी, माजिवडा, कोलशेत, बाळकूम आदी परिसरातील हजारो कुटुंबांचा समावेश आहे. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी मिळवून देण्याचा श्री.केळकर यांचा संकल्प आहे.
मासुंदा, खारकर आळी, चरई, उथळसर आणि आसपासच्या भागात देखील ही जोडणी करण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित देखील होणार आहे. माजी नगरसेवक सुनेश जोशी, निलेश कोळी, रवी रेड्डी, निलेश पाटील, तन्मय भोईर, महापालिका आणि महानगर गॅस प्रतिनिधी यांच्या सहकार्याने ही मोहीम सध्या जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे आमदार संजय केळकर हे या कामाचा सातत्याने पाठपुरावा करत असून दर १५ दिवसांनी रहिवासी, महानगर गॅसचे अधिकारी यांच्या एकत्रित बैठका घेत आहेत. त्यामुळे प्रलंबित समस्या मार्गी लागून गॅस जोडणीच्या कामाला वेग आला आहे.